आई-वडिलांना आयुष्याचे हिरो मानणाऱ्या महाराष्ट्र पोलीस अकादमीतील पोलीस निरीक्षक पदावर कार्यरत असलेल्या द्वारका विश्वनाथ डोखे (वय 49) यांनी अखेर आठ वर्षाच्या अथक परिश्रमानंतर जगातील सर्वोच्च माऊंट एव्हरेस्ट शिखर (8,848.86मीटर ) सर करण्याची मोहीम फत्ते केली. आपल्या आई-वडिलांची नावे सर्वोच्च स्थानी पोहोचवून त्यांना जगावेगळी श्रद्धांजली अर्पण करण्याचे स्वप्न डोखे यांनी उराशी बाळगले होते. त्यांची जिद्द, महत्त्वकांक्षा अन कठोर परिश्रम बघता महाराष्ट्र पोलीस दलानेही त्यांच्या पंखात बळ भरले अन तिरंगा व पोलीस दलाचा ध्वज बुधवारी (दि.22/05/2024) त्यांनी अभिमानाने एवरेस्टवर फडकविला.
सरळसेवेतून पोलीस उपनिरीक्षक म्हणून 2006 साली द्वारका डोखे या पोलीस दलात रुजू झाल्या. 2016 सालापासून गिर्यारोहणाची आवड जोपासणाऱ्या डोखे यांचे 2022 साली एवरेस्ट सर करण्याची मोहीम अंतिम टप्प्यात शारीरिक त्रासामुळे अर्धवट राहिली होती. त्यांनी 2016 सालापासून गिर्यारोहण सुरू केले होते. 2019 साली लोकसभा निवडणूक लागल्यामुळे त्यांना एव्हरेस्टची चढाई करता आली नाही. त्यानंतर दोन वर्षे कोरोनाची साथ असल्यामुळे पुन्हा त्यांची मोहीम खंडित झाली. डोखे यांनी दुर्दम्य इच्छाशक्ती, महत्त्वकांक्षा आणि आपल्या आई-वडिलांसह भारत देशावर तसेच पोलीस दलावर असलेल्या प्रेमापोटी एव्हरेस्ट सर करण्यास पुन्हा एकदा 2023 साली महाराष्ट्र पोलीस अकादमीच्या मातीतून तयारी सुरू केली. कठोर परिश्रम घेत सराव करून त्यांनी स्वतःला या मोहिमेसाठी सज्ज केले.
24 मार्च 2024 रोजी त्या नेपाळच्या काठमांडू येथे पोहोचल्या. तेथे त्यांनी नेपाळमधील शिखर सर करणाऱ्या 8K Expeditions Pvt Ltd या अग्रेसर कंपनीचे मालक लकपा शेरपा तसेच पासंग शेरपा यांच्या मार्गदर्शनाखाली एव्हरेस्ट सर करण्यास सुरुवात केली. तब्बल 55 दिवसांच्या अथक परिश्रमानंतर हवामान बदल हिमवर्षाव जोरदार सोसाट्याचा वारा अशा वातावरणीय आव्हानांचा सामना करत त्यांनी एव्हरेस्टची चढाई सुरू ठेवली. 55 व्या दिवशी दिनांक 22 मे रोजी पहाटे 4 वाजून 10 मिनिटांनी त्यांनी एव्हरेस्टचे टोक गाठले. तेथे आठ मिनिटांची विश्रांती घेत तिरंगा व महाराष्ट्र पोलीस दलाच्या ध्वज अभिमानाने फडकविला अन दिवंगत आई वडिलांची फोटोफ्रेम हातात घेत अनोखी जगावेगळी श्रद्धांजली अर्पण केली.
महाराष्ट्र पोलीस दलातील सर्व वरिष्ठ अधिकारी यांच्या कडून त्याच्या या अविश्वसनीय कामगिरी बद्दल अभिनंदन केले आहे.